संक्षिप्त इतिहास

"कुडाळदेशकर आद्यगौड ब्राम्हण" हे तीन केवळ शब्द किंवा लेबल नसून ह्या त्या तीन वैशिष्ठ्यपूर्ण खूणा आहेत. आद्यगौड ही वंशाची खूण, कुडाळदेशकर हे राजकीय कतृत्व व वैदिक परंपरेचा वारसा दर्शवणारा ब्राम्हण हे विशेषण!

हे आहे आपले ज्ञातित्व.

साहित्याचार्य वासूदेव ज. गोसावी,
श्रीमठ संस्थान दाभोली.

कुडाळदेशकर ही नुसती जाती नसून ज्ञाती आहे. जाती हा उत्पत्तीदर्शक शब्द असून, ज्ञाती हा "ज्ञाप्ति" दर्शवतो. ज्ञाप्ति म्हणजे विशेष योग्यता! नैसर्गिक ऊत्पत्तीमधून जात चिकटते, पण कर्तृत्व, वैशिष्ठ्य ह्यातून समाजाची ओळख किंवा "ज्ञाप्ति" बनते व "ज्ञाति"ची संज्ञा मिळते. म्हणून "जायते इति जाति:" आणि "ज्ञायते इति ज्ञाति:".

ज्ञातिची ही जाणिव विशेषत: ३ गोष्टितून प्रकट होते : १. वंश/कूळ, २. सामर्थ्य/कतृत्व व ३. संस्कृति. कुठल्यातरी शीलवान कुळाचे वंशज ही जाणिव, त्या वंशातील दैदिप्यमान कतृत्वाचा सार्थ अभिमान व विशिष्ठ धर्म/सामाजिक परंपरेची जपणूक ह्या ज्ञातिच्या तीन खूणा असतात. "कुडाळदेशकर आद्यगौड ब्राम्हण" हे तीन केवळ शब्द किंवा लेबल नसून ह्या त्या तीन वैशिष्ठ्यपूर्ण खूणा आहेत. आद्यगौड ही वंशाची खूण, कुडाळदेशकर हे राजकीय कतृत्व व वैदिक परंपरेचा वारसा दर्शवणारा ब्राम्हण हे विशेषण! हे आहे आपले ज्ञातित्व.

शास्त्रोक्त संदर्भ : मूळ आर्यांचे ब्रम्हावर्त नावाचे पवित्र राज्य होते. समाजव्यवस्थेच्या दृष्टिने मूळ आर्यात ३ प्रजाती पडल्या : ब्राम्हण, क्षत्रीय व वैश्य. जरी ह्यांची कामे वाटलेली होती तरी ब्राम्हणांना सर्व प्रकारचे शिक्षण घेण्यास मुभा होती. ह्यामुळे ब्राम्हण सर्व जातीचे धार्मिक, लष्करी व व्यावसाइक शिक्षक बनले. शिवाय त्यांनी अनार्यांपासून वेदांचे व स्वजातीयांचे रक्षणही केले, लोकांना वैदीक धर्माची शिकवण दिली. ब्रम्हावर्तातील ज्या मूळ ब्राम्हणांनी "संरक्षणाचे" काम केले त्यांना "गौड" ही संज्ञा मिळाली! (गौड हा शब्द मूळ गुड = रक्ष = रक्षण करणे) ब्रम्हावर्त ही ब्राम्हणांची मूळ जागा असल्याने तिथल्या गौडांना "आद्यगौड" किंवा मूख्यगौड म्हणायची प्रथा पडली. हेच ते शास्त्रविद्येतही प्रविण असलेले पुरातन ब्राम्हण! परशूरामांची "इदं ब्राम्हमिदं क्षात्रं, शापादपि शरादपि" हे खरे आद्यगौडांना लागू पडते. ह्याचा आधार घेता, कुडाळदेशकर मूळ "बंगालचे गौड" हे लागू पडत नाही.

हिमालयात उगमस्‍थान असलेल्‍या गंगा, यमुना ह्‍या दोन्‍हीं नद्यांचा संगम अलाहाबाद येथे होतो. सरस्‍वती नदी इ.स.पूर्व ६००० ते ४००० या काळात शिवालिक पर्वतामधून “आदिबद्री” या पठारावरील भागात येत असे. सरस्‍वती नदी आदिबद्री या स्‍थानापासून कुरूक्षेत्राजवळून राजस्‍थानातून कच्‍छच्‍या रणामधून अरबी सागराला मिळत होती. इ.स.पूर्व ३००० च्‍या दरम्‍यान झालेल्‍या भौगोलिक घडामोडीत तिच्‍या मार्गातील प्रस्‍तर उंच झाले व या नदीचे दोन भाग झाले. एक पश्‍चिमेस सतलज नदीला मिळाला व पूर्वेचा यमुनेला मिळाला, तेव्‍हापासून अलाहाबादला त्रिवेणी संगम म्‍हणू लागले. सरस्‍वती नदी व यमुना नदी यांच्‍यामधील भूभागाला कुरूक्षेत्र म्‍हणत. तोच गौड देश होता. या भागात गौड, कान्‍यकुब्‍ज, सारस्‍वत, उत्‍कल , मैथील असे प्रांत होते. त्‍याच्‍यावरून पंचगौड ब्राह्‍मणांना ती नावे पडली. गौड ब्राह्‍मणांमध्‍ये "गौड प्रांतातील" ब्राम्हणांना आद्य गौड, मु्‍ख्य गौड, श्री गौड किंवा गौडाद्य अशा विवीध संबोधानांनी ओळखतात. इ.स.पूर्व ३००० वर्षापूर्वी सरस्‍वती नदी लुप्‍त झाल्यावर जे स्‍थलांतरीत होउन शेवटी कुडाळदेशी स्‍थिर झाले ते कुडाळदेशकर आद्य गौड ब्राह्‍मण!

पंचगौड : ब्रम्हावर्तातील ज्या गौडांनी सरस्वती ओलांडून मध्यउत्तर, मध्यपश्चिम भारतात वस्ती केली ते "गौड सारस्वत". जे कान्यकुब्ज प्रदेशात राहीले ते "कान्यकुब्ज गौड". जे विदेह राज्यात मैथील राजधानीत स्थलांतरीत झाले ते "मैथील" व जे ओरीसात उत्कल भागात गेले ते "उत्कल" असे सगळे पंचगौड म्हणून ओळखले जातात.

अकराव्या शतकाच्या आरंभी, गंगाकिनारी "मूंज" नामक भूप्रदेशावर "देवशर्मा" नामक "आद्य गौड ब्राह्‍मण" राजाचे राज्य होते. गझनीच्या महमुदाने सन १०१७ मध्ये केलेल्या स्वारीत ह्या संस्थानाचा पराभव झाला व राजा देवशर्मा आपल्या सहकारी, नातेवाइकांसोबत स्थलांतर करून कोकणात आला. तत्कालीन कोंकणच्या शास्तादेव कदंब राजांनी देवशर्माला आश्रय दिला व "कुडाळ" प्रांताचे मांडलिकी अधिकार इ.स. १०२० मध्ये दिले. यांचें मूळ गोत्र काश्यप असून त्यांच्या बरोबर आणखी तेरा गोत्रांचीं दुसरीं ब्राह्मण घराणीं कोंकणांत आलीं होतीं. ह्या १४ घराण्यांनी सर्व दृष्टिने उत्कृष्ठ अशा १४ गावांमधे वसाहती केल्या. राजा देवशर्मा स्वत: हिंदळे गावी राहीला. ह्या १४ गावांना मूळ भूमिकेचे (मूळभूंकेचे) गांव म्हणतात. ह्या शिवाय अधिक ४ गावे ह्यांनी कालमानापरत्वे उर्जितावस्थेस आणली, ज्यांना जोड भूमिकेची (जोडभूंकेचे) गावे म्हणतात.

मूळ भूमिकेची गांवे : वालावली, धामापूर, नेरूर, पाट, परूळे, म्हापण, खानोली, आजगांव, गोळवण, केळूस, वेतोरे, दाभोली, तेंडोली, तिरवडे.

जोड भूमिकेची गावे : कोचरे, मसदे, चेंदवण, माळगाव. ह्यांना देशसत्तेची गावे असेही म्हणतात.

वालावली, धामापूर, नेरूर, पाट, परूळे हे प्रमूख ५ गांव होते ज्याला मध्यवर्ती वालावलीत श्रीनारायणाची स्थापना कुडाळदेशकर घराण्यातील सूर्यभान व चंद्रभान राजांनी केली. ह्या पाच प्रमूख गावांपैकी परूळ्यास सामंत, धामापूरास नायक, वालावली-नेरूळ-पाट येथे प्रभू व इतर सर्व ठिकाणी मतकरी/महाजन नामक अधिकारी होते. ह्यांचा समावेश कुडाळदेशाच्या प्राचीन राजमंडळात होत असे.

प्रमुख पंचायतन देवता : श्री लक्ष्मीनारायण - वालावल, श्री कलेश्वर - नेरूर, श्री देवी भगवती - धामापूर, श्री आदिनारायण (सूर्यदेव) - परूळे, श्री गणेश - पाट.

देवशर्मा शिवोपासक असून कुणकेश्वराचा निस्सीम भक्त होता व कुणकेश्वराची त्याच्यावर अनंत कृपा होती. त्याला जोगदेव नामक पराक्रमी मुलगा होता. जोगदेवाला उगीदेव नामक मुलगा होता जो देवशर्माचा नातू! ह्या तीन पिढ्या, सुमारे २०० वर्षे कुडाळदेशकरांच्या मूळ पुर्वजांनी साधारण प्रतीच्या राजवैभवाचा उपभोग घेतला.

पुढे देवगिरीचे यादव राजांच्या कारकिर्दीत देवशर्म्याच्या वंशात "मांगल" (माइंग किंवा मांग किंवा माइंदेव किंवा मलिनाथ) नामक महापराक्रमी पुत्राचा (देवशर्माचा पणतू) जन्म झाला. आद्य गौड ब्राह्‍मणांच्या सामंत घराण्याची स्वतंत्र राजसत्ता स्थापना करणारा हाच तो महापराक्रमी राजा मंगमहिपती! त्याची मूळ राजधानी "कुडुवलपत्तन" म्हणजे कुडाळदेश! महिपती माइंदेव १२५० साली दिवंगत झाला व नंतर त्यांचा "देम भूपाल" हा अधिपती झाला.

देमनृपाला गडियकसिंह, निर्भयमल्ल, भुजबलभिव, षांडेराय अशी बिरूदे होती. हा महादेवराय यादव व रामदेवराय यादव ह्यांचा समकालीन होता. ह्यानंतर भैरवभूपती सामंत (देमनृपाचा मुलगा) सत्तेवर आला. भैरवभूपतीने कुणाचीही मदत न घेता केवळ स्वबळावर १४व्या शतकाच्या अखेर पर्यंत बहामनी सुलतानांपासून कुडाळभूमीचे रक्षण केले व साम्राज्य प्रबळ केले.

ह्यानंतर काइंदेवाचा मुलगा, नागदेव सामंत राजगादीवर आला. हा तिसरा व शेवटचा महापराक्रमी सामंत राजा ज्याने स्वताला "बली" हे विशेषण घेतले होते. त्याने शहाच्या "मलिक-उल्-तुजार" सारख्या महाबलाढ्य सेनापतीसही दाद दिली नाही. पण नाग सामंतांनंतर ह्या राजसत्तेचा -हास झाला व सूत्रे आद्यगौड प्रभू-देसाइ घराण्याकडे गेली. सामंत राजवंशाचा संक्षिप्त गोष्टिरूप इतिहास वाचा >>

आपल्या ह्या कुडाळदेशावर आद्य गौड ब्राह्‍मणांची सत्ता इ.स. १०२० पासून इ.स. १६९६ पर्यंत होती!