दाभोली मठाचा इतिहास

संसारे सत्वयोगाय धर्मनिर्झर वाहिनम्। कुडाळ देशचैतन्यं पूर्णानंदं भजामहे!

मठ संस्थान दाभोलीचा इतिहास वेगळे लिहीण्याचे कारण म्हणजे तो कुडाळदेशकरांच्या धर्मपरंपरेच्या इतिहासातील एक विभाग नसून स्वतंत्र परंपराच असल्यासारखा आहे. जसे राजा देवशर्माने जरी कुडाळ क्षेत्री आद्यगौडांची प्रस्थापना केली तरी कुडाळदेशकरांचे दैदिप्यमान राज्य व सत्ता स्थापन करायचे श्रेय मंगमहिपतीला जाते, तसेच दाभोली मठाच्या बाबतीत आहे. श्री स्वामी विमलानंदांनी जरी कुडाळदेशकर समाजाच्या धर्मपरंपरेचा पाया रचला तरी त्यावर योगसाधनेचे व मार्गदर्शनाचे धर्मशिल्प श्री पूर्णानंद स्वामी महाराजांनी दाभोली येथे रचले!

धर्मपरंपरेचा पूर्व इतिहास : १३व्या शतकाच्या उत्तरार्धात (साधारण सन १४८८) कुडाळपासून जवळच "स्वर्णवट" (सोनवडे) येथे प्रभू-देसाइ लोकपाल चंद्रभान-सूर्यभान यांच्या राजाश्रयाने शंकराचार्य परंपरेतील मठाची स्थापना केली व श्रीमत् विद्यापूर्णानंद हे पहिले मठाधिपती झाले. श्री विद्यापूर्णानंदांचे पूर्वाश्रमीचे आडनाव सामंत-देसाई असे होते व सोनवडे मठ त्यांच्याच जागेत बांधला होता. आद्य श्री शंकराचार्यांपासून दहावे, शृंगेरी मठाचे प्रसिद्ध स्वामी श्रीमत् विद्याशंकर तीर्थ हे त्यांचे गुरू होते. ह्या मठात ६ मठाधिपती होवून गेले : श्री स्वामी विद्या पूर्णानंद, श्री स्वामी प्रज्ञानानंद, श्री स्वामी भुमानंद, श्री स्वामी पूर्णानंद (२ रे), श्री स्वामी ब्रम्हानंद, श्री स्वामी पूर्णानंद (३ रे)! ह्यानंतरचे स्वामी श्री रामानंद ह्यांना सावंतांचा व आप्तस्वकीयांचा कलह, अशांतता, अस्थिरता, सहकार्याचा अभाव ह्यामुळे मठ सोडून काशीला जावे लागले.

चिंदर मठ : काशी यात्रेहून परत आल्यावर श्री रामानंद स्वामींना गणेश प्रभू (३रा) यांनी साळशी महालावरील चिंदर नामक ग्रामी एक छोटा मठ बांधून दिला (सन १६००). हे रामानंद स्वामींचे निवासस्थान बनले. पुढे त्यांनी आपले शिष्य श्री सदानंद महाराज ह्यांच्या हाती मठाचा कारभार सोपवला व चैत्र वद्य प्रतिपदेला श्रीमत् रामानंद स्वामी महाराज समाधिस्त झाले. आजही त्यांची समाधी जागृत आहे! ह्या मठात ४ स्वामी झाले : श्री रामानंद स्वामी, श्री सदानंद महाराज, श्री भवानंद महाराज व श्री पूर्णानंद महाराज (४थे). ह्यापैकी पहील्या ३ समाध्या इथे पहायला मिळतात. श्री भवानंद महाराजांचे २ शिष्यश्रेष्ठ होते : श्री पूर्णानंद व श्री चिदानंद. श्री पूर्णानंद कुडाळदेशकरांचे स्वामी झाले तर श्री चिदानंद सारस्वतांच्या कवळे मठाचे पहिले मठाधिपती झाले.

चिंदर नंतर गोळवण येथे कुडाळदेशकरांनी नविन मठ स्थापन केला, जिथे वरील चिंदर मठाधिपती श्री पूर्णानंद महाराज वास्तव्यास आले. त्यांनी आपले शिष्य श्री सहजानंद ह्यांच्याकडे कारभार सोपवून १९४५ साली माघ वद्य पौर्णिमेला समाधी घेतली. गोळवण मठात श्री पूर्णानंद महाराज, श्री सहजानंद स्वामी व श्री विज्ञानानंद स्वामी अशी परंपरा झाली…

श्रीमत् पूर्णानंद स्वामी व श्रीक्षेत्र दाभोली मठ

स्वयं श्री शंकराचार्यांनी श्रृंगेरी (ज्योती, गोवर्धन व शारदा ही इतर २ पिठे) पिठाची स्थापना करून श्री सुरेश्वराचार्यांना त्याची जबाबदारी दिली. श्रृंगेरी पिठाने भविष्यात करवीर, संकेश्वर, कुडलगी, बेलूर इ. अनके पिठे स्थापन केली. बेलूर मठाचे तिसरे मठाधीश परमपूजनीय "स्वामी श्री विश्वानंद" होत. सुमारे ३५० वर्षांपूर्वी महान सिद्धयोगी परम सद्गुरू श्री विश्वानंद स्वामी ह्यांनी दाभोली येथील भारद्वाज गोत्रातील एक तपोनिधी गृहस्थ "श्री सिद्धे प्रभू" (मूळ सिद्धोपंत) ह्यांना शिष्य करून घेऊन त्यांना "श्री पूर्णानंद" असे नामाभिदान दिले. फोंड सांवंत राज्याचे प्रतिनिधी श्री सुखटणकरांनी श्रीमठ सोनवडे (मूळपिठ व बहुतेक चिंदर, गोळवण सुद्धा) ची व्यवस्था आपल्या सारस्वत जातीच्या कवळे मठ, गोवा कडे हस्तांतरीत केली. त्यामुळे श्री पूर्णानंद स्वामी महाराज श्रीमठ सोनवडे हे मूळ गुरूस्थान सोडून निसर्ग रम्य अशा दाभोली स्थानी वास्तव्यास आले. त्यांनी सन १७७५ मध्ये दाभोलीच्या नूतन धर्मपिठाची स्थापना केली. हाच तो आजचा दाभोली मठ. श्रीमत् पूर्णानंद स्वामी महाराज हे महातपस्वी, 'अमृत महासिद्धि' प्राप्त, वैराग्यसंपन्न, वेदोक्त अधिकारी होते. महासिद्धि योगामुळे ते साक्षात्कारी महापुरूष झाले. ह्या सिद्ध, ज्ञानी, तपस्वी, विरक्त आद्य श्रीमठाधिपतिंच्या दर्शनाने विखूरलेले सर्व ज्ञातिबांधव एकत्र आले. केवळ कुडाळदेशकरच नव्हे तर इतर ज्ञातितील लोकही त्यांना मानू लागले. दाभोली मठाची किर्ती सर्वदूर पसरली!

सुमारे २५० वर्षांपुर्वी शके १६८७ चैत्र वद्य चतुर्थीला श्रीमठात श्रीमत् पूर्णानंद स्वामी महाराज ह्यांनी संजिवन समाधी घेतली. सिद्धयोगी श्री ज्ञानेश्वर महाराज, श्री राघवेंद्र स्वामी ह्यांप्रमाणेच, श्रीमत् पूर्णानंद स्वामी महाराज जिवंत असताना, स्वेच्छेने, निर्धारपूर्वक जाणिवेने तयार केलेल्या समाधि विवरात स्वत: उतरून चिरंतन समाधीस बसले! संजिवन समाधिस्त अशा ह्या दैवी विभूतिचे अस्तित्व आज मितीसही अनेक साधक भक्तांना शिष्यांना प्रचितीपूर्ण आधार देत आहे. संजिवन समाधीमूळे २५० वर्षांनंतरही इथले वातावरण पवित्र, उदात्त आहे. निवृत्तीमय, मंगलमय आहे. ज्ञातिबांधवांपैकी अनेकांनी समाधिस्थानी नतमस्तक होउन ह्या मन:शांतीचा वैराग्याचा अनुभव घेतला आहे..

श्रीमत् पूर्णानंद स्वामी महाराजांनी चमत्कारीक रित्या आपल्या चरमवयात आजगांवचे भारद्वाज गोत्रीय रूद्राजीपंत नामक ८ वर्षाचे असताना शिष्य बनवले. त्यांना पट्टभिषेक करून समाधिस्त झाले. रूद्राजीपंत स्वत: मोठे अधिकारी पुरीष होते. त्यांचे श्रीमत् चिदानंद असे नामभिधान होते. आपल्या गुरूमहाराजांनी भूषवलेल्या गादीवर बसणे उचित होणार नाही असे वाटल्यावर ते श्रीमठ संस्थान दाभोली येथे पिठाधीश बनले नाही. त्याऐवजी त्यांनी "बागलाची राइ" येथे स्वतंत्र मठाची स्थापना केली व तिथून धर्मजागृतीचे कार्य केले. त्यानी 'स्वानंदलहरी' (श्री गुरूगीता वर टीका) नावाचा अलौकीक ग्रंथ रचीला. त्यांनी "बागलाची राइ" येथेच संजिवन समाधी घेतली! संतचरित्राचे मुकुटमणि असलेल्या दासगणू महाराजांनी स्वत: श्रीमत् चिदानंद स्वामींचे चरित्र लिहीले आहे..

श्रीमठ संस्थान दाभोलि येथील गुरूपरंपरा

श्रीमत् पूर्णानंद स्वामी महाराजश्रीमत् सिद्धाश्रम स्वामी महाराज१५श्रीमत् शंकराश्रम स्वामी महाराज
श्रीमत् चिदानंद स्वामी महाराजश्रीमत् कृष्णाश्रम स्वामी महाराज१६श्रीमत् कृष्णाश्रम स्वामी महाराज
श्रीमत् कृष्णाश्रम स्वामी महाराज१०श्रीमत् शंकराश्रम स्वामी महाराज१७श्रीमत् विमलानंद सरस्वती स्वामी महाराज
श्रीमत् शांताश्रम स्वामी महाराज११श्रीमत् पूर्णाश्रम स्वामी महाराज१८श्रीमत् शंकरानंद सरस्वती स्वामी महाराज
श्रीमत् पूर्णाश्रम स्वामी महाराज१२श्रीमत् शंकराश्रम स्वामी महाराज१९श्रीमत् ब्रम्हानंद सरस्वती स्वामी महाराज
श्रीमत् कृष्णाश्रम स्वामी महाराज१३श्रीमत् कृष्णाश्रम स्वामी महाराज२०श्रीमत् रामानंद सरस्वती स्वामी महाराज
श्रीमत् शांताश्रम स्वामी महाराज१४श्रीमत् शांताश्रम स्वामी महाराज२१श्रीमत् प्रद्युम्नानंद सरस्वती स्वामी महाराज

वरीलपैकी श्री चिदानंद स्वामींची समाधी बागलाची राई येथे, श्री शांताश्रम (२रे) ह्यांची समाधी आजरे येथे असून, कृष्ण नदी  आणि  चंदनभाट येथे २ समाध्या आहेत. पहिले मठाधीश श्री पूर्णानंद स्वामी यांची मुख्य समाधी व तिच्या आसपास १८ मिळून एकूण १९ समाध्या मठाच्या इमारती मध्ये  आहेत.  मठाच्या इमारती शेजारी डोंगराच्या उतरणीवर दोन समाध्या आहेत. दाभोली मठाचे आराध्यदैवत श्री नारायण असून विद्यमान मठाधीश सुद्धा नारायण हा मंत्र जपतात. मठात प्रवेश केल्यानंतर सुरवातीला श्री नारायण मंदिर लागतो. दाभोली हा वैष्णव मठ नसूनही  श्री नारायण आराध्यदैवत आहे.

दाभोली मठ, बागलाची राइ, हरीचरणगिरी, गोळवण, चिंदर अशा कुठल्याही मठांबाबत काही माहिती असल्यास किंवा जुने फोटो उपलब्ध असल्यास जरूर संकर्क करा.