कुडाळदेशकर धर्मसत्तेचा इतिहास

इतिहास २ प्रकारचा असतो : धर्म व राजकीय. धर्माचा इतिहास सत्प्रवृत्तीतून उदयास येतो तर राजकीय इतिहास संघर्षातून. कुडाळदेशकरांचा इतिहास दोन्ही प्रकारचा व तितकाच रोचक आहे. राजकीय इतिहास हा ओढाताणीचा, संघर्षाचा, लढायांचा इतिहास आहे. आक्रमणे झाली, जय-पराजय झाले, स्थलांतरे झाली, सत्तांतरे झाली, कारस्थाने ही झाली.. आज कुडाळदेशकर समाजाची सत्ता तर गेलीच पण त्याच्या खूणाही शिल्लक नाहीत. धर्माचा इतिहास हा शंकराचार्यांच्या परंपरेतून उदयास आला. ही कुडाळदेशकरांची प्रभावी सत्ता होती. जिथे राजेशाही लयास गेली पण धर्मसत्ता टिकली हे वर्तमान आहे. कारण ह्यामागे योगसामर्थ्य व गुरूपरंपरा होती! आजही कुडाळदेशकरांचा दाभोली मठ तेजाने व तपश्चर्येने तळपत आहे व पिढ्यानुपिढ्या मार्गदर्शक ठरत आहे…

धर्म ही चैतन्यशक्ति आहे. धर्म मर्यादा शिकवतो, आचरणाचे नियम घालतो! धर्माचरणाने समाजात सत्व जागृत होते. धर्माचरण थांबले की सत्व संपून जाते, समाज दुबळा होतो व रसातळाला जातो! म्हणूनच प्रत्येक समाजाला धर्माचरणाची, सूत्राची गरज असते.

कुडळदेशकर मूळचे ब्राम्हण असल्याने त्यांच्या मूळ आचरण धर्माचे होते. घरी प्रथमपासून पुजाअर्चा, देवधर्म चालूच असायचा. आपापल्या गावातील स्थानिक देवताना, ग्रामदेवताना ते भक्तिभावाने वंदन करीत. शिवाय त्यांनी त्यांच्या पंचायतन देवताही स्थापन केल्या होत्या. याच काळात दक्षिणभारतात शंकराचार्यांचा प्रभाव असल्याने, गुरूमार्ग प्रबळ होत होता. महाराष्ट्रामधे वारकरी संप्रदाय व भक्तिमार्ग उगम होत होता. त्यामुळे कुडाळदेशकरांचाही एक धर्मगुरू असावा, धर्मपिठ/मठ असावा अशी भावना समस्त कुडाळदेशकरांमधे मूळ धरू लागली. म्हणून १३व्या शतकाच्या उत्तरार्धात कुडाळपासून जवळच "स्वर्णवट" (सोनवडे) येथे प्रभू-देसाइ लोकपाल चंद्रभान-सूर्यभान यांच्या राजाश्रयाने शंकराचार्य परंपरेतील मठाची स्थापना केली व श्रीमत् विद्यापूर्णानंद हे पहिले मठाधिपती झाले. श्री विद्यापूर्णानंदांचे पूर्वाश्रमीचे आडनाव सामंत-देसाई असे होते व सोनवडे मठ त्यांच्याच जागेत बांधला होता. आद्य श्री शंकराचार्यांपासून दहावे, शृंगेरी मठाचे प्रसिद्ध स्वामी श्रीमत् विद्याशंकर तीर्थ हे त्यांचे गुरू होते. ह्या मठात ६ मठाधिपती होवून गेले : श्री स्वामी विद्या पूर्णानंद, श्री स्वामी प्रज्ञानानंद, श्री स्वामी भुमानंद, श्री स्वामी पूर्णानंद (२ रे), श्री स्वामी ब्रम्हानंद, श्री स्वामी पूर्णानंद (३ रे)!

ह्यानंतरचे स्वामी श्री रामानंद ह्यांना सावंतांचा व आप्तस्वकीयांचा कलह, अशांतता, अस्थिरता, सहकार्याचा अभाव ह्यामुळे मठ सोडून काशीला जावे लागले. गणेश प्रभू नामक कुडाळदेशकर राजा सात्विक होता. कुटुंबांतर्गत कलह व राजकारणाला कंटाळून तो श्रीमत् रामानंद स्वामी महाराज ह्यांच्या आश्रयाने सोनवडे मठात रहायला आला. पण त्याचा चुलत भाऊ रामजी प्रभू ह्याने धर्मबंधन न मानता श्रींच्या मठास वेढा दिला. श्रींनी गणेश प्रभू समवेत मठ सोडला आणि तेव्हा पासून कुडाळदेशकरांच्या राज्यास कायमची उतरती कळा लागली.. पुढील अनेक वर्षे ह्या प्रांतास स्वस्थता व शंातता लाभली नाही.

१६व्या शतकापर्यंत हा मठ कार्यरत होता. सावंतवाडीच्या भोसलेकुळातील राजांनी ह्या मठासाठी काही जमीनी दिल्याचाही उल्लेख आहे. आजही ह्या मठामध्ये ३ समाध्या पहावयास मिळतात ज्यातील एक गौडपादाचार्यांचे ६३वे गुरू सच्चिदानंद सरस्वती ह्यांची असून ह्याचा उल्लेख विकीपिडीयावर श्री गौडपादाचार्य मठच्या पानावर मिळतो.

चिंदर मठ : काशी यात्रेहून परत आल्यावर श्री रामानंद स्वामींना गणेश प्रभू यांनी साळशी महालावरील चिंदर नामक ग्रामी एक छोटा मठ बांधून दिला. हे रामानंद स्वामींचे निवासस्थान बनले. पुढे त्यांनी आपले शिष्य श्री सदानंद महाराज ह्यांच्या हाती मठाचा कारभार सोपवला व चैत्र वद्य प्रतिपदेला श्रीमत् रामानंद स्वामी महाराज समाधिस्त झाले. आजही त्यांची समाधी जागृत आहे! ह्या मठात ४ स्वामी झाले : श्री रामानंद स्वामी, श्री सदानंद महाराज, श्री भवानंद महाराज व श्री पूर्णानंद महाराज (४थे). ह्यापैकी ३ समाध्या इथे पहायला मिळतात.

चिंदर नंतर गोळवण येथे कुडाळदेशकरांनी नविन मठ स्थापन केला, जिथे वरील चिंदर मठाधिपती श्री पूर्णानंद महाराज वास्तव्यास आले. त्यांनी आपले शिष्य श्री सहजानंद ह्यांच्याकडे कारभार सोपवून १९४५ साली माघ वद्य पौर्णिमेला समाधी घेतली. गोळवण मठात श्री पूर्णानंद महाराज, श्री सहजानंद स्वामी व श्री विज्ञानानंद स्वामी अशी परंपरा झाली. गोळवण येथील स्वामी परंपरा अजूनही चालू आहे. ह्याचा संदर्भ पुढे सारस्वतांच्या कवळे मठात व गौडपादाचार्य परंपरेत मिळतो… (विकी संदर्भ)

आश्चर्यकारक म्हणजे सारस्वतांचे ५७वे धर्मगुरू श्री पूर्णानंद महाराज हे गोव्यातून पोर्तूगीज जाचाला कंटाळून ह्याच काळात ह्याच "गोळवण मठात" स्थलांतरीत झाल्याची नोंद आहे. शिवाय त्यांचे ५८, ५९ व्या धर्मगुरूंची नावे देखील हीच आहेत. व त्यानंतरचे ३ स्वामी (६०-६१-६२) चिंदरला अनुक्रमे श्री रामानंद, श्री सदानंद, श्री भवानंद राहील्याचा ऊल्लेख आहे. आपल्या इतिहासानुसार आधी चिंदर मठ व मग गोळवण असा ऊल्लेख असून सारास्वतांकडे नेमका ऊलट ऊल्लेख दिसतो. ह्यातून सारस्वतांचे ५७वे धर्मगुरू श्री पूर्णानंद महाराज जे गोव्यातून पोर्तूगीज 'गोळवण मठात' स्थलांतरीत झाले तेच कुडाळदेशकरांचे गोळवणचे स्वामी की काय अशी शंका येते! ह्यातील महत्वाचा भाग म्हणजे कुडाळदेशकर राज्यकर्ते व सामान्यजनही नेहमी सारस्वतांशी प्रेमाने व आदराने वागले असून वेळोवेळी त्यांनी सारास्वतांना आश्रय दिल्याचे व मदत केल्याचे स्पष्ट होते!

सोळाव्या शतकाच्या उत्तरार्धात गोमांतक प्रांतावर पोर्तुगिज व इतर परकीयांचे मोठ्या प्रमाणावर आक्रमण झाली. मोठ्या प्रमाणावर लोकांना धर्मांतराला भाग पाडले गेले. शेकडो देवळांचा विध्वंस झाला. अशा परिस्थितीत असंख्य हिंदू पळून कुडाळ प्रांतात आले. इथले राजे/ग्रामसत्तेचे अधिकारी कुडाळदेशकर असल्याने त्यांना चांगला राजाश्रय मिळाला. शिवाय अनेकांना राज दरबारी वेतनावर नोक-या मिळाल्या. राजे प्रभुदेसाईंनी आपल्या प्रधान मंडळात नाडकर्णी नामक गृहस्थाचीही नेमणूक केली होती…

इ. स. १७४५ साली दाभोली मठाची स्थापना झाली. दाभोली हे नावच आपल्याला सांगते की, हे तपस्व्यांचे निवासस्थान होते. दाभोली ह्या शब्दाचा अर्थ "दर्भावली". जसे धर्म चे धम्म तसेच दर्भचे दभ्भ व त्याची ओळ म्हणजे म्हणजे दभ्भावली. हा तपोनिधी श्री पुर्णानंद स्वामींचा आश्रम आहे. इथे बारा महिने वाहणारा अखंड झरा आहे, जो अखंड तळीत ओतत राहतो. दाभोली मठाच्या स्थापनेपासूनचा इतिहास

कोण म्हणूनी काय विचारता? आम्ही कुडाळदेशकर आद्य गौड ब्राम्हण!

आद्यगौडाच्या संक्रमणाच्या मागेपुढेच गौड सारस्वत (शेणवी) देखील तळकोकणात आले. त्यातील काही विघ्नसंतोषी लोकांनी "कुडाळदेशकर राजसत्तेचा" द्वेष करत होइल तितकी हानी करण्यचा प्रयत्न केला. इतर समाज विरूद्ध ब्राम्हण राजसत्ता अशा कलागती करण्याचा प्रयत्न केला. त्यात १७व्या शतकात वाडीकर सावंतांचा उदय झाला व हळूहळू आद्यगौडांचे राज्य संपूष्टास येउ लागले. तेव्हा कुडाळदेशकरांचा अक्षरश: छळ सुरू झाला. त्यांच्याकडून सर्व अधिकार काढून घेण्यासाठी स्वजातीयच 'गौड सारस्वत'/शेणवी सरसावले. ४ वेळा कुडाळदेशकरांकडून बामनदंडही वसूल करण्यात आला. त्यांचा उल्लेख कुदे, सुको बांगडो अशा अपमानकारक व हीन शब्दांनी होउ लागला. खुद्द कुडाळ गावांतून अनेक कुडाळदेशकरांनी स्थलांतर केले. पण तरीही त्यांनी आपल्या पंचायतन देवता, कुलदेवता व गुरूपिठ ह्याबद्दलची निष्ठा भंग होऊ दिली नाही! एततप्रांती राहणारी अनेक कुटुंबे दारीद्रयात जाऊनही प्रयत्नपूर्वक स्वाभिमान टिकवून होती…

ह्या दरम्यान इंग्रजी सत्तेचा अंमल चालू झाला. इंग्रज सुधारणावादी व प्रागतीक होते. नागरी सुविधा व जिवनमान ऊंचावू लागले होते. मूळच्याय हुषार व धाडसी कुडाळदेशकर समाजाने फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घेतली! केवळ वैयक्तिक प्रगतीवर लक्ष न देता, एकमेकांच्या सहाय्याने सामाजीक प्रगती साधली. अनके ज्ञातिसंस्था ऊभ्या राहिल्या. त्यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपासून ते गरजूंपर्यंत मदतीचा ओघ पोचला.

विसाव्या शतकाच्या प्रारंभी शैव पंथाचे शेणवी व वैष्णव पंथाचे साष्टिकर ह्यांनी परस्पर वैमनस्य विसरून "गौड सारस्वत ब्राम्हण" म्हणून एकत्र यायचा प्रस्ताव ठेवला. ह्यामधे सातार्डे मठाचे पेडणेकर व चित्रापूर मठाचे कर्नाटकी सारस्वत ह्यांनाही एकत्र आणायचे प्रयत्न चालू होते. पण सारस्वतांनी "कवळे मठाधिपतींना" शरण येऊन प्रायश्चित्त घ्यावे अशा दुराग्रह धरल्याने कुडाळदेशकर व चैत्रापूरकर ह्यापासून दूर झाले.

ह्या दरम्यान स्वामी विमलानंद कुडाळदेशकरांचे (दाभोली मठ) मठाधिपती होते. त्यांनी कुठलीही असामाजिक कृती न करता आपल्या परंपरेला शोभेल असा संयमाचा मार्ग अवलंबला व कुडाळदेशकरांच्या व गुरुपिठांच्या थोर व आश्वासक परंपरेची माहीती द्यायला ते सर्वदूर फिरले. त्याच दरम्यान कै. गणेश परूळेकर ह्यांचा "कुडाळदेशातील आद्यगौड ब्राम्हणांचा इतिहास" १९१५ मध्ये प्रकाशीत झाला व कुडाळदेशकर समाज पुन्हा प्रकाशात आला! १९२५ साली कै. रावबहाद्दूर वासूदेव अनंत बांबार्डेकर ह्यांनी विमलानंद स्वामींच्या शुभाशिर्वादाने "मठगांवचा शिलालेख व ब्राम्हण सामंतराजवंश" हा भारत प्रबंध इतिहास संशोधन मंडळाकडून पुरस्कृत करून घेतला. ह्यावर विद्वानांनी अनेक वाद घातले पण बहुआयामी बांबार्डेकर सर्वांना पुरून उरले. सदरील लेख/पुस्तकाची कॉपी मी आपल्या सर्वांच्या अवलोकनार्थ उपलब्ध करत असून आपण सर्वांनी ही किमान एकदा पहावी अशी नम्र विनंती.