कुडाळदेशकर राजसत्तेचा इतिहास (सामंत राजवंश)

मूळ आर्यांचे ब्रम्हावर्त नावाचे पवित्र राज्य होते. समाजव्यवस्थेच्या दृष्टिने मूळ आर्यात ३ प्रजाती पडल्या : ब्राम्हण, क्षत्रीय व वैश्य. जरी ह्यांची कामे वाटलेली होती तरी ब्राम्हणांना सर्व प्रकारचे शिक्षण घेण्यास मुभा होती. ह्यामुळे ब्राम्हण सर्व जातीचे धार्मिक, लष्करी व व्यावसाइक शिक्षक बनले. शिवाय त्यांनी अनार्यांपासून वेदांचे व स्वजातीयांचे रक्षणही केले, लोकांना वैदीक धर्माची शिकवण दिली. ब्रम्हावर्तातील ज्या मूळ ब्राम्हणांनी "संरक्षणाचे" काम केले त्यांना "गौड" ही संज्ञा मिळाली! (गौड हा शब्द मूळ गुड = रक्ष = रक्षण करणे) ब्रम्हावर्त ही ब्राम्हणांची मूळ जागा असल्याने तिथल्या गौडांना "आद्यगौड" किंवा मूख्यगौड म्हणायची प्रथा पडली. हेच ते शास्त्रविद्येतही प्रविण असलेले पुरातन ब्राम्हण!

भारताला ५ हजारहून अधिक वर्षांचा ज्ञात इतिहास आहे! भौगोलीक संदर्भानुसार "आद्य गौड ब्राह्‍मण" ज्ञातीच्या कुटूंबांनी इ.स. ७०० पासून विंध्य पर्वत ओलांडून दक्षीण कोकणात आगमन केले. "गौड" ज्ञातिकडे वैदिक ज्ञानाबरोबरच क्षात्रतेज व व्यावसाइक वृत्ती होती. ह्या गुणबाहूल्यामुळे तात्कालीन "चालुक्य" राजांनी साळशी महालात त्यांना आनंदाने आश्रय दिला व सामावून घेतले. हे आद्यगौडांचे प्रथम स्थलांतर..

अकराव्या शतकाच्या आरंभी, गंगाकिनारी कनौज राज्याजवळ "मूंज" नामक भूप्रदेशावर "देवशर्मा" नामक "आद्य गौड ब्राह्‍मण" राजाचे राज्य होते. हा कनौजच्या गौडेश्वर पाल नामक राजाचा मांडलिक होता. गझनीच्या महमुदाने सन १०१७ मध्ये केलेल्या स्वारीत कनौजचे महाबालढ्य व अजेय्य समजले जाणारे संस्थान एका दिवसात पराभूत झाले. महमूद ने अनेक मंदीरे फोडली, अनन्वित अत्याचार केले. तितक्यात त्याला "मुंज"च्या ब्राम्हण राज्याविषी कळले. त्याने रातोरात मुंजवर हल्ला केला. राजा देवशर्माने प्रयत्नांची शिकस्त केली पण गझनीच्या महाबलाढ्य सैन्यासमोर ह्या संस्थानाचा पराभव झाला व राजा देवशर्मा आपल्या सहकारी, नातेवाइकांसोबत स्थलांतर करून दक्षीणेस कोकणात आला. कोकणात तेव्हा कदंब राजघराणे राज्य करत होते व कोकण गोवा बेळगांव पर्यंत त्यांच्या सीमा पसरल्या होत्या! तत्कालीन कोंकणच्या शास्तादेव कदंब राजांनी (कल्याणीच्या जयसिंह चालुक्य राजाचा मांडलीक), देवशर्माला आश्रय दिला. देवशर्माने देवगड तालुक्यांतील “हिंदळे” गावा जवळ वसाहत केली. यांचें मूळ गोत्र काश्यप असून त्यांच्या बरोबर आणखी तेरा गोत्रांचीं इतर ब्राह्मण घराणीं कोंकणांत आलीं होतीं. ह्या १४ घराण्यांनी सर्व दृष्टिने उत्कृष्ठ अशा १४ गावांमधे वसाहती केल्या. ह्या १४ गावांना मूळ भूमिकेचे (मूळभूंकेचे) गांव म्हणतात. ह्या शिवाय अधिक ४ गावे ह्यांनी कालमानापरत्वे उर्जितावस्थेस आणली, ज्यांना जोड भूमिकेची (जोडभूंकेचे) गावे म्हणतात. [2] तात्कालील कोकणाधिपती कदंब राजांनी राजा देवशर्मा ला "कुडाळ" प्रांताचे मांडलिकी अधिकार इ.स. १०२० मध्ये दिले. येथून कुडाळदेशकर ब्राह्मण ज्ञातीच्या इतिहासास सुरुवात होते…

राजा देवशर्मा स्वत: हिंदळे गावी राहीला. तो शिवोपासक होता. त्याने व त्याच्या पराक्रमी वंशजांनी स्वबळावर सत्ता वाढवली. त्यामुळे सर्वच कुडाळदेशकर घराण्यांना क्षात्रवृत्तीचा अंगीकार करावा लागला. देवशर्मा शिवोपासक असून कुणकेश्वराचा निस्सीम भक्त होता व कुणकेश्वराची त्याच्यावर अनंत कृपा होती. त्याला जोगदेव नामक पराक्रमी मुलगा होता. जोगदेवाला उगीदेव नामक मुलगा होता जो देवशर्माचा नातू! ह्या तीन पिढ्या, सुमारे २०० वर्षे कुडाळदेशकरांच्या मूळ पुर्वजांनी साधारण प्रतीच्या राजवैभवाचा उपभोग घेतला…
पुढे देवगिरीचे यादव राजांच्या कारकिर्दीत देवशर्म्याच्या वंशात "मांगल" (माइंग किंवा मांग किंवा माइंदेव किंवा मलिनाथ) नामक महापराक्रमी पुत्राचा (देवशर्माचा पणतू) जन्म झाला. सुरुवातीस माइंदेव ह्याने यादव राजांच्या सैन्याचे काही लढाइत नेतृत्व केले. माइंदेवाच्या नेतृत्वाखाली यादव सेनेने सौराष्ट्र (काठेवाडातील राजे), यदुवंशीय लाट (गुजराथेकडील यादव) त्याहूनही प्रबळ तिलिंग गौड (तेलंगणातील गौडदेशी), हम्मीर, द्रविडदेशाचे राजे (होयसळ बल्लाळ), आणि पांडिनाथ राजे (मदुरा अथवा उच्चंगीदुर्ग येथील पांडय संस्थानिक) यांचा धुव्वा उडवून यादव साम्राज्याचा विस्तार केला. ह्यानंतर त्याने यादवांच्या कोकण-गोवा (कदंब) साम्राज्याचा "सेनापती" म्हणून जबाबदारी सांभाळली. ह्या दरम्यान त्याने कदंबवंशीय राजांचे राज्य बारा वर्षापर्यंत आक्रमण करून जिंकणा-या, वसलेल्या गुप्त राजांचे पूर्ण उच्चाटन केले. माइंदेवाने सिंघण यादव राजांचा महाप्रधान, सर्वाधिकारी, महापरमविश्वासी अशी बिरूदे संपादन केली. महापराक्रमी व सत्वशील असणा-या माइंदेवाने मूळ राजसत्तेशी प्रमाणिक रहात विजयादित्याचा मुलगा श्रीमत्रिभुवनमल्ल यास लहानपणीच राज्याभिषेक करून त्याजवरील प्रेमाने सबंध राष्ट्राचे पालन केले व विश्वस्त म्हणून राज्यकारभार केला. पण सन १२२० च्या दरम्यान त्रिभुवनमल्ल कदंबानंतर कदंब-राजवेल खूंटली व संपूर्ण 'कदंब राज्य' माइंदेवाच्या स्वतंत्र अधिपत्याखाली आले व तो मंगमहिपती बनला. माइंदेवाना "सामंतकुल यशोभानु: मांगलाख्य महेश्वर:" अशी स्वातंत्र्य व पराक्रम निदर्शक उपाधि मिळाली. आद्य गौड ब्राह्‍मणांच्या सामंत घराण्याची स्वतंत्र राजसत्ता स्थापना करणारा हाच तो महापराक्रमी राजा मंगमहिपती! त्याची मूळ राजधानी "कुडुवलपत्तन" म्हणजे कुडाळदेश!

महिपती माइंदेव १२५० साली दिवंगत झाला व नंतर त्यांचा "देम भूपाल" हा अधिपती झाला. देमनृपाने आपल्या राज्यात स्थैर्य आणले. त्याचे राज्य शांतता आणि समृद्धी ह्याने परिपूर्ण होते. शांततेमुळे त्याला अंतर्गत व्यवस्थेकडे आणि धार्मीक बाबींकडे लक्ष देता आले. तो साधूंचा व देव-ब्राम्हण ह्यांचा प्रतिपालक होता. त्याने पंढरपूरच्या विठोबास देणगी दिल्याचे व धर्मकार्य केल्याचे १२७०सालचे शिलालेख आहेत. राजधानीतील कुडाळेश्वराचे देऊळ व कर्ली नदीवरील संध्याघाट त्यानेच बांधला. देमनृपाला गडियकसिंह, निर्भयमल्ल, भुजबलभिव, षांडेराय अशी बिरूदे होती. हा महादेवराय यादव व रामदेवराय यादव ह्यांचा समकालीन होता.

ह्यानंतर भैरवभूपती सामंत (देमनृपाचा मुलगा) सत्तेवर आला. हा मंगभूपतीसारखचा महापराक्रमी होता. त्या दरम्यान कोकणावर बहामनी सुलतानांचे हल्ले चालू झाले होते. भैरवभूपतीने कुणाचीही मदत न घेता केवळ स्वबळावर १४व्या शतकाच्या अखेर पर्यंत कुडाळभूमीचे रक्षण केले व साम्राज्य प्रबळ केले. त्याच्या कतृत्वाच्या व पराक्रमाच्या खूणा हिंदळे-दिवगळे भागातील भैरवाचे मंदीर, घाटी, भैरवाचा किल्ला ह्यातून जाणवते. परकीय (मुसलमान) आक्रमाकांचे शिरकाण करणारा हा पहिला कुडाळदेशकर नृप, ज्याने देवशर्माच्या आद्यगौड कुळास पुनश्च गतवैभव व किर्ती प्राप्त करून दिली.

ह्यानंतर काइंदेवाचा मुलगा, नागदेव सामंत राजगादीवर आला. हा तिसरा महापराक्रमी सामंत राजा ज्याने स्वताला "बली" हे विशेषण घेतले होते. पण १५वे शतक चालू झाले होते व काळ कठीण होता. बहामनी, व तूर्क मुसलमानांच्या स्वा-या वाढतच होत्या. भरतातील असंघटीत हिंदू राजे आपसातील भेदांमूळे व एकटे पडल्यामुळे पराभूत होत होते. अल्लाऊद्दिन शहा ने दिलावर खानची नेमणूक केली. दिलावर खान ने कोकणपट्टीतील रायरी, सोनगड संस्थाने जिंकून सोनगड राजाची कन्या शहासाठी नजराणा म्हणून आणली. पण साधारण १४५० साली कोकणातील हिंदू राजांनी संघटीत होऊन ही राज्ये परत मिळवली. मग शहाने "मलिक-उल्-तुजार" ह्या महाबलाढ्य सरदाराची नेमणूक केली. मलिक-उल्-तुजारने कोंकण लुटले, माहीम (मुंबईकडील) व साष्टी ही बेटे घेतली. विशाळगडच्या शिर्के नामक मराठा संस्थानिकावर स्वारी करून त्यास जिंकले व त्याला "मुसलमान हो नाहीतर ठार मारतो" असा आग्रह धरला. शिर्के हा अत्यंत चाणाक्ष सरदार होता. त्याने तुंजार ला गळ घातली की "मी मुसलमान होतो, पण आधि आपण माझा वंशपरंपरागत शत्रू असलेल्या कोकणच्या राजावर हल्ला करून त्याला बाटवूया!". तुंजार तयार झाला. त्याला कोकणात यायचेच होते. वास्तविक हे वेबनावाचे सर्व ढोंग असून मुसुलमानांचा नायनाट करण्याकरीता त्यावेळच्या प्रमुख मराठ्यांनी ही युक्ती योजिली होती. शिरक्याने मलिकास सह्याद्रीच्या अत्यंत अडचणीच्या जागेत नेऊन सोडल्यानंतर पूर्वी ठरल्याप्रमाणे नागदेवराय व इतर मराठे सरदारांनी त्यांच्यावर हल्ला करून त्याचा सपशेल धुव्वा उडविला. वरील प्रसंगानंतर १६ वर्षे मुसुलमान भीतीने कोकणात फिरकले नाहीत.

वरील इतिहास प्रयत्नपूर्वक कथनात्मक व मनोरंजनात्मक व प्रेरणादायी मांडला असून तो १००% तत्थ्याधिष्टीत नाही. पण हे करत असताना कुडाळदेशकर समाज, त्यांचा इतिहास, कतृत्व ह्याचा उपमर्द होणार नाही ह्यावर लक्ष दिले आहे. तरी काही चूकभूल आढळल्यास जरूर कळवा.

  • स्पष्टिकरण व संदर्भ - मूळ भूमिकेची गांवे : वालावली, धामापूर, नेरूर, पाट, परूळे, म्हापण, खानोली, आजगांव, गोळवण, केळूस, वेतोरे, दाभोली, तेंडोली, तिरवडे. जोड भूमिकेची गावे : कोचरे, मसदे, चेंदवण, माळगाव. ह्यांना देशसत्तेची गावे असेही म्हणतात. वालावली, धामापूर, नेरूर, पाट, परूळे हे प्रमूख ५ गांव होते ज्याला मध्यवर्ती वालावलीत श्रीनारायणाची स्थापना कुडाळदेशकर घराण्यातील सूर्यभान व चंद्रभान राजांनी केली. ह्या पाच प्रमूख गावांपैकी परूळ्यास सामंत, धामापूरास नायक, वालावली-नेरूळ-पाट येथे प्रभू व इतर सर्व ठिकाणी मतकरी/महाजन नामक अधिकारी होते. ह्यांचा समावेश कुडाळदेशाच्या प्राचीन राजमंडळात होत असे.